वाळूज महानगर : वाळूज महानगरात घरफोड्याचे सत्र सुरुच आहे. बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात दोन दिवसांपूर्वी तीन पान टपऱ्या फोडून जवळपास पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्या.ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा सिडको देवगिरी नगरातील बंद घर फोडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
सुधीर शंकर माळी हे सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगर मध्ये डी - २९/३ येथे कुंटुबासह वास्तव्यास आहेत. माळी हे भाच्याचे लग्न असल्याने बुधवारी दुपारी कुटुंबासह औरंगाबाद येथे गेले होते. दरम्यान बुधवारी रात्री चोरट्यांनी माळी यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील साहित्याची उचका उचकी गेली. दरम्यान शेजारी उदावंत यांना गुरुवारी सकाळी माळी यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडा दिसला.
त्यामुळे उदावंत यांनी ही माहिती दुसरे शेजारी प्रल्हाद गायकवाड यांना ही माहिती दिली. गायकवाडी यांनी माळी यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना चोरट्यांनी घर फोडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच माळी यांनी घरी धाव घेवून घराची पहाणी केली असता कपाटातील ठेवले कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. मात्र लग्नाला जात असताना सोन्याचे दागिणे सोबत नेल्यामुळे किंमती ऐवज बचावल्याचे माळी यांनी सांगितले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.