वाळूज महानगर : दुचाकीस्वार दोन माथेफिरु तरुणांनी हैदोस घालत शुक्रवारी मध्यरात्री सिडको वाळूज महानगरात सहा चारचाकी वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणारे माथेफिरु सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या घटनेमुळे वाहनधारकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
वाळूज महानगरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थानिक पोलिसांचा जरब राहिलेला नाही. शिवाय रात्रीची गस्तही कमी झाली आहे. त्यामुळे चोरी, घरफोडी, हाणामारी आदी गुन्हेगारी घटनांत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीस्वार दोन माथेफिरुंनी हैदोस घालत सिडकोत रस्त्यावर उभी असलेल्या सहा चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
महावितरण कार्यालयाकडून दुचाकीवर आलेल्या दोघा माथेफिरुंनी सिडकोतील रस्त्यावर उभी असलेली राजे शिव छत्रपती भारतीय संस्कार विद्यामंदिर शाळेची बस (एमएच - २०, ईजी - १७३६) फोडण्याचा प्रयत्न केला. पण बसच्या समोरील काचा लाकडी दांडा मारुनही फुटत नसल्याने त्यांनी बसच्या दोन्ही बाजूच्या आरशाची तोडफोड केली. त्यानंतर माथेफिरुंनी आपला मोर्चा इतर वाहनाकडे वळवून बाजूलाच उभी असलेली ग्रा.पं. सदस्य रमाकांत भांगे यांच्या कारची (एमएच - २०, बीडब्ल्यु - ७७७१) पाठीमागील काच फोडली. त्यानंतर काही अंतरावर उभी असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या दोन्ही आरसे फोडले. पीयूष विहार सोसायटीसमोरील महेशचंद्र कोरी यांच्या कारची (एमएच - २०, ईजे - १४२३) समोरील काच फोडली. कारची काच फोडल्याचा मोठा आवाज होताच कोरी कुटुंब व शेजारचे लोक जागी झाले. नागरिक बाहेर येताच माथेफिरुं नी दुचाकीवरुन तेथून धूम ठोकली, असे कोरे यांनी सांगितले.
अयोध्यानगर एसटी कॉलनीतील सुभाष सोळंके यांच्या कारचाही (एमएच - २०, डीजे - ३४८४) आरसा फोडला असून, देवगिरीनरातील औषध दुकानदार इंद्र वर्मा यांच्या कारची (एमएच - २०, यु - ३९१५) समोरील काच फोडली आहे. पोलिसांनी घटनास्थाळी पाहणी केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या घटना लक्षात घेवून पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.