वाळूज महानगर : सिडको ग्रोथ सेंटर येथे गुरुवारी अचानक गवताला आग लागल्याने अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. अग्निशमन जवानांनी वेळीच आग विझविल्याने उर्वरित झाडे बचावली आहेत.
सिडको वाळूज महानगरातील ग्रोथ सेंटर जवळील वाळलेल्या गवताला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. हवेमुळे आग पसरुन नाल्यालगत टाकलेल्या कचऱ्याला आग लागली. कचऱ्याने पेट घेताच आगीचे लोळ उठले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने नागरिकांनी ही माहिती वाळूज एमआयडीसी अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन अधिकारी के.ए. डोंगरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले.
जवळपास अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीत सिडको हरित पटट््यातील कडू लिंब, बाभुळ, कात शेवरी, सुबाभूळ आदी अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. मात्र, अग्निशमन जवानांनी वेळीच आग विझविल्याने यातील शेकडो झाडे बचावली आहेत. अज्ञात व्यक्तीने पेटती सिगारेट गवतात फेकल्याने आग लागली असावी, असे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी के.ए. डोंगरे, पी.एम. राठोड, एस.वी. रोडगे, सी.डी. साळवे, आर.ए. चौधरी आदींनी परिश्रम घेतले.