वाळूज महानगर : सिडकोच्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. मात्र, दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. टंचाईच्या काळात दररोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको वाळूज महानगर निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. विशेष म्हणजे येथून सिडकोच्या अधिकाºयासह कर्मचारी ये-जा करतात. तरीही या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दीड ते दोन कि़मी. अंतरावर जलवाहिनीला जवळपास सहा ठिकाणी गळती सुरु आहे. यातील तीन ठिकाणी मोठी तर इतर ठिकाणी वॉल्व्ह लिकेज आहेत. विशेष म्हणजे गळतीचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.