वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातून जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला चार ठिकाणी गळती लागली आहे. तसेच जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याचा अपव्यय होत असून, याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
सिडको प्रशासनातर्फे एमआयडीसीकडून पाणी घेऊन सिडको वाळूज महानगरातील अनेक सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो. बजाजगेट कंपनीजवळ असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावरुन जलवाहिनीद्वारे पाणी सिडको महाननगरात आणण्यात येते. सिडको महानगरातील जलकुंभाकडे जाणाºया या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती झाली आहे. या जलवाहिनीला बसविण्यात आलेल्या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आहे.
या परिसरातील व्यवसायिक व नागरिक गळती लागलेल्या ठिकाणी भरण्यासाठी गर्दी करतात. तसेच दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहने धुण्यासाठीही नागरिक गर्दी करतात. सिडको प्रशासनाकडून या व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येते. मात्र, काही दिवसांत नागरिक व्हॉल्व्हशी छेडछाड करीत असल्यामुळे गळती कायमस्वरुपी बंद होताना दिसत नाही. परिणामी सिडको वाळूजमहानगरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.
विशेष म्हणजे या रस्त्यावर जलवाहिनीला अवघ्या २०० मीटर अंतरावर ४ ठिकाणी गळती लागलेली असून, पाण्याची नासाडी सुरु आहे. या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करुन पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.