औरंगाबाद : वाळूज-पंढरपूर रस्त्यावरील लुधियाना ढाब्यासमोर असलेल्या पानटपरीमध्ये बंदी असलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेटचा साठा सातारा पोलिसांनी जप्त केला. यात तब्बल २,२०० रुपये प्रतिनग किंमत असलेल्या पाच सिगारेटचा समावेश आहे. आरोपीच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
प्रवीण दगडू पैठणपगारे (रा. वाळूज) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज-पंढरपूर रस्त्यावरील लुधियाना ढाब्याच्या समोरच लुधियाना पान सेंटर नावाची टपरी आहे. या टपरीमध्ये बंदी असलेल्या ई-सिगारेट विकण्यासाठी ठेवल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. त्यानुसार निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक सर्जेराव सानप, सहायक फाैजदार नंदकुमार भंडारे, हवालदार सुनील धुळे, मनोज अकोले, दीपक शिंदे, सुनील पवार यांच्या पथकाने छापा मारून परदेशी बनावटीच्या २७ ई-सिगारेट जप्त केल्या. यात १८ सिगारेटची किंमत प्रत्येकी ९०० रुपये, ५ सिगारेटची प्रतिनग २,२०० आणि ४ सिगारेटची प्रतिनग २ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. एकूण ३५ हजार २०० रुपये किमतीच्या २७ सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात हवालदार सुनील धुळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत.