औरंगाबाद : शहरातील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती भाग असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा भागात आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. कधी कधी १२ व्या दिवशीही पाणी येते. आलेले पाणी पूर्ण दाबाने नसल्यामुळे पिण्याचेही पाणी भरले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा वॉर्डामध्ये पाण्याच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. आठ- दहा दिवसाला पाणी येते. जे येते तेही कमी दाबाने येते, त्यामुळे पाणी साठविण्यासाठी घरात असलेली साधनेही भरून घेता येत नाहीत, अशी तक्रार या भागातील रहिवासी धीरज पवार यांनी केली. याविषयी कितीही तक्रारी केल्या तरीही समस्या काही सुटत नाही. याच वॉर्डातील गवळीपुऱ्यातील काही घरांना तर पाणीच पोहोचत नसल्याचे धीरज पवार यांनी स्पष्ट केले. नितेश पट्टेकर म्हणाले, पाण्याच्या समस्यामुळे सगळेच जण हैराण आहेत. अनेकांना महापालिकेच्या टाकीवरून पाणी भरून आणावे लागते. यात स्त्रियांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ऋतुराज कोठुळे म्हणाले, आठ-दहा दिवसाला येणारे पाणीही आमच्या काही घरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अनेकांना पिण्याचेही पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणी न मिळणाºया घरांकडे प्रशासनासह पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे. त्याकडे सर्वांनीच लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणीही कोठुळे यांनी केली. बाळूभाऊ नामागवळी म्हणाले, पाणी येत नाही. जे आले ते कमी दाबाने येते. यात टँकरही महापालिका पाठवून देत नाही. महिलांना हंड्याने पाणी आणावे लागते. शहराच्या मध्यवस्तीत नागरिकांना असा त्रास सहन करावा लागत आहे. गवळीपुºयामधील किरण भगत म्हणाले, आठ-दहा दिवसाला येणाºया पाण्यामुळे अडचणीचा सामना करावा लागतो. टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागते. छोट्या टँकरसाठी ५५० ते ६०० रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या टँकरचा दर हा ७०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हे पैसे कोठून आणायचे हा प्रश्न पडतो, असेही भगत यांनी सांगितले. पाणीटंचाईविषयी नगरसेवक फेरोज खान यांना विचारले असता, त्यांनी वॉर्डात दहा ते बारा दिवसाला पाणी येते. तीन-चार दिवसाला पाणी येण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली. आंदोलने केली आहेत. तरीही प्रशासन हालत नाही. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दखल घेत नाहीत. पाण्याच्या टाकीसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यासुद्धा सोडविण्यात येत नाहीत, त्यामुळे पाणीपुरवठा मागील वर्षभरापासून विस्कळीत झालेला आहे. यात प्रशासन दोषी आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.
आठ- दहा दिवसांच्या पाणीफेरीने नागरिक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:24 PM
शहरातील सर्वात जुनी आणि मध्यवर्ती भाग असलेल्या नवाबपुरा-गवळीपुरा भागात आठ ते दहा दिवसांनंतर नळाला पाणी येत आहे. कधी कधी १२ व्या दिवशीही पाणी येते. आलेले पाणी पूर्ण दाबाने नसल्यामुळे पिण्याचेही पाणी भरले जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या.
ठळक मुद्देनवाबपुरा-गवळीपुरा : प्रशासनाचे दुर्लक्ष; मागणी केली तरीही समस्या सुटेना