छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांची कामे काही केल्या संपायला तयार नाहीत. औरंगपुरा ते नेहरू भवन येथील रस्ता एक महिन्यापासून खोदून ठेवण्यात आला. त्यानंतर, महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जलवाहिन्या टाकण्याची आठवण झाली. आता जलवाहिन्यांसाठी काम थांबवून ठेवण्यात आल्याने, हजारो नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतोय.
विशेष बाब म्हणजे, स्मार्ट सिटीने शहरात कुठेही रस्त्यासाठी खोदकाम केले नाही, याच ठिकाणी खोदकाम का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. ३१७ कोटी रुपये खर्च करून शहरात १०१ रस्ते तयार करण्याचे काम स्मार्ट सिटीने अडीच वर्षांपूर्वी ए.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. जवाहरनगर ते रोपळेकर हॉस्पिटल, चंपा चौक येथे रस्त्याची कामे निकृष्ट केली. एका ठिकाणी रोड फाेडून नव्याने केला. १०१ रस्ते स्मार्ट असतील, असा दावा प्रशासनाने केला होता, तो फोल दिसत आहे. आतापर्यंत ७० रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावाही प्रशासनाने केला. गुणवत्ता तपासणीचे काम आयआयटी मुंबईला दिले आहे. या शिखर संस्थेने गुणवत्तेवरून पीएमसी, कंपनीचे वाभाडे काढले. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. मागील आठवड्यात ओंकारेश्वर रोडवर खड्ड्यात पडून बुलेटस्वार जखमी झाला. आता औरंगपुरा ते नेहरू भवन या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दीड वर्षापूर्वी स्मार्ट सिटीने या रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. एका निवृत्त अधिकाऱ्याने जुन्या रस्त्याचा दोषदायित्व कालावधी (डीएलपी) संपला का, असा प्रश्न करताच, मनपा अधिकाऱ्यांना घाम फुटला. त्यामुळे काम गुंडाळून ठेवले. आता कसेबसे एक महिन्यापूर्वी काम सुरू केले. त्यात राजकीय मंडळींनी हस्तक्षेप केला. कामाला गती येत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिन्यांचा मुद्दा काढला. आता जलवाहिन्या, ड्रेनेजलाइनची कामे झाल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू होणार नाही, अशी अवस्था आहे. वाहनधारक या खोदलेल्या रस्त्यातूनच ये-जा करीत आहेत.
रस्ते उंच, घर खाली...स्मार्ट सिटीने जेवढ्या रस्त्यांची कामे केली, तेथे कुठेच खोदकाम केले नाही. त्यामुळे रस्ते उंच आणि नागरिकांची घरे खाली, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. पावसाळ्यात रस्त्याचे पाणी नागरिकांच्या घरात येऊ लागले. नेहरू भवन, बुढ्ढीलेन भागातच दीड ते दोन फुटांपर्यंत खोदकाम केले. कटकटगेट भागात तर तब्बल तीन फुटांपर्यंत रस्ता उंच बनला.
आम्ही प्रामाणिकपणे काम करतोयनेहरू भवन ते औरंगपुरा रस्त्याचे डीएलपी पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदाराने जलवाहिन्यांसाठी रस्ता रात्रीतून खोदून टाकला. दीड वर्षांपूर्वी आम्ही रस्त्यांची यादी दिली, तेव्हापर्यंत त्यांनी जलवाहिन्या टाकल्या नाहीत. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करतोय.-इम्रान खान, प्रकल्प व्यवस्थापक, स्मार्ट सिटी