छत्रपती संभाजीनगर : शहर आणि जिल्ह्यात आजारांचा ‘ताप’ वाढला आहे. एकाच वेळी डेंग्यू, कोरोना आणि स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा संशयित रुग्णांची संख्या अधिक असून, सर्दी, खोकला, तापेने नागरिक हैराण होत आहेत.
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांत सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूसोबत कोरोना आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
कोरोनाचे रूग्ण किती?शहरात गुरुवारी आणखी ३ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सध्या कोरोनाचे १३ रुग्ण सक्रिय आहेत. सुदैवाने हे सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
स्वाइन फ्लूचे किती रुग्ण?जिल्ह्यात जून ते ८ ऑगस्टपर्यंत एकूण १२ स्वाइन फ्लूच्या रुग्णांचे निदान झाले. शहरात स्वाइन फ्लूच्या ६ रुग्णांचे निदान झाल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली.
८ दिवसांत ‘डेंग्यू’चे १४ संशयित, एक पाॅझिटिव्हशहरात गेल्या ८ दिवसांत ‘डेंग्यू’चे १४ संशयित रुग्ण आढळले. तर डेंग्यूच्या एका रुग्णाचे निदान झाले. जुलै महिन्यांत शहरात ९ आणि ग्रामीण भागात एका डेंग्यू रुग्णाचे निदान झाले होते.
प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे‘डेंग्यू’ रोखण्यासाठी नागरिकांनी घराच्या परिसरात, छतावर पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. सर्दी, खोकला असेल तर मास्क वापरावा. साचलेल्या पाण्यात ऑइल टाकणे, सांडपण्यात ॲबेटिंग करणे आदी उपाय महापालिकेकडून केले जात आहे. नागरिकांनी आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी.- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा