औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ विश्रांतीनगर आणि जयभवानीनगरात पाडापाडीची मोहीम राबविल्यानंतर मनपाने आता भीमनगर भागातही एका रस्त्याची मार्किंग केली आहे. यामध्ये सुमारे शंभर घरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मनपाच्या अधिकाऱ्यांनी केवळ एकाच बाजूने जास्तीची मार्किंग केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.महानगरपालिकेने विकास आराखड्यातील ८० फुटांचा एक रस्ता मोकळा करण्यासाठी आठवडाभरापूर्वी विश्रांतीनगर आणि जयभवानीनगर भागात पाडापाडीची मोहीम केली. त्यानंतर याच भागात आता शिवाजीनगर- रामनगर रस्त्याआड येणाऱ्या इमारती पाडल्या जाणार आहेत. त्यातच मनपाच्या पथकाने शनिवारी भावसिंगपुऱ्यातील भीमनगरमध्येही एका रस्त्यासाठी मार्किंगची कारवाई केली. याठिकाणी रमाबाई चौक ते अमिन चौक या भागात ही मार्किंग करण्यात आली आहे. सध्या येथे काही भागात ४० फूट तर काही ठिकाणी ५० फुटांचा रस्ता आहे. मनपाच्या पथकाने येथे सुमारे सहाशे मीटरपर्यंत शंभर फुटांची आणि पुढे पन्नास फुटांच्या रस्त्याची मार्किंग केली आहे. यामध्ये येथील सुमारे शंभरहून अधिक घरांचा बराचसा भाग जात आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सुमारे दहा वर्षांपासून या रस्त्याचा विषय चर्चेत आहे. २००४ साली आणि त्यानंतरही काही वेळा येथे मार्किंग झाले होते. परंतु नंतर हा विषय शांत झाला. येथे काही लोक २०-३० वर्षांपासून राहत आहेत. आता मनपाने पुन्हा मार्किंग केले आहे. हे मार्किंग करतानाही रस्त्याचा मध्य काढलेला नाही. उलट एकाच बाजूने जास्त प्रमाणात रस्ता दाखविला आहे. मनपाने हा रस्ता रद्द करावा, अशी मागणी पीटर सुधाकर बत्तीसे, संदीप आरसूड, रमेश इंगळे, सय्यद शाकेर आदींनी केली आहे.अधिकारी गप्प...मनपाच्या नगररचना विभागातर्फे शनिवारी या ठिकाणी मार्किंग करण्यात आली. मात्र याविषयी नगररचना विभागातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. दुसरीकडे वारंवार प्रयत्न करूनही सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भीमनगरातील नागरिक हवालदिल
By admin | Published: September 08, 2015 12:23 AM