तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथील रहिवासी सुलताना रियाज पठाण व रियाज मिजाज पठाण यांनी शासकीय कामासाठी येथील तहसील कार्यालयात लिंबेगाव शिवारातील गट क्रमांक २०३ व २०६ मधील ८ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या नोंदीप्रमाणे अकृषिक आदेश (क्र. ११६७, ११६९, १६०१ व १६२२)च्या संपूर्ण छायांकित प्रती मिळविण्यासाठी २२ ऑक्टोबर, २०२० रोजी नियमानुसार अर्ज दिला होता. सदरील संचिकेसाठी अर्जदार शासकीय रक्कम भरण्यास तयार असून व त्यासाठी कार्यालयात वेळोवेळी चकरा मारूनही कार्यालयाच्या वतीने निर्गमित केलेल्या आदेशाच्या प्रती न मिळाल्याने अर्जदार वैतागले आहेत.
आठ दिवसांची मर्यादा, सात महिन्यांपासून प्रतीक्षा
शासकीय नियमानुसार मागणी अर्जानंतर आठ दिवसांच्या आत प्रत देणे बंधनकारक आहे, तरीही पठाण यांना सात महिन्यांनंतरही संचिका मिळाल्या नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून संचिका देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने, सदरील चारही अकृषिक आदेश व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष घालून व्यवहाराची सत्यता तपासून पाहावी, अशी मागणीही पठाण यांनी केली आहे.