वाळूज महानगर: वाळूज येथे गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून निघणारी काजळी नागरी वसाहतीत पसरत असून, यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला आहे. या संबधी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सोमवारी कंपनीच्या अधिकाºयांनी पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली.
वाळूजच्या कमळापूररोडवर गरवारे कंपनीकडून काही वर्षांपूर्वी बॉयलर उभारण्यात आलेला आहे. या बॉयलरच्या चिमणीमधून सतत धूर व काजळी बाहेर पडत असल्यामुळे प्रदुषणाचा धोका वाढला आहे. काही दिवसांपासून या बॉयलरची काजळी अविनाश कॉलनी, शिवाजीनगर, दत्त कॉलनी, गंगा कॉलनी, समता कॉलनी या नागरी वसाहतीत घराच्या छतावर पडत आहेत.
या बॉयलरमधून पडणारी काजळी हवेबरोबर नागरी वसाहतीतील टेरेस व घराच्या छतावर साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेत. यामुळे घरांच्या भिंती काळवंडत असून, छतावर वाळण्यासाठी घातलेले कपडेही काळे होत आहेत. दररोज सकाळी झाड-झुड करताना काजळीचे थर टेरेस व छतावर साचलेले दिसून येतात. विशेष म्हणजे नागरी वसाहतीलगत कंपनीकडून बॉयलर उभारले असून, या बॉयलरमधून सतत काळा धूर बाहेर पडत आहे. या धुराचे लोळ हवेत मिसळत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
गत तीन-चार वर्षांपूर्वीही या बॉयलरमधून काजळी वाºयाबरोबर नागरी वसाहतीत साचत असल्याची ओरड या परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यामुळे कंपनीकडून या बॉयलरची जागा बदलुन काही अंतरावर बॉयलर बसविले होते. आता पुन्हा या बॉयलरमधून पडणारी काजळी नागरी वसाहतीत साचत असल्याने या परिसरातील नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, गरवारे कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे अविनाश वाणी यांनी इतर अधिकाºयांना सोबत घेऊन पाहणी केली. वाणी यांच्याशी संपर्क साधला असता कंपनीने यापूर्वीच मोठा खर्च करुन हा बॉयलर पाठीमागे हटविला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर या भागात पाहणी करण्यात आली असून या, संदर्भात तज्ज्ञाकडून तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदुषण मंडळाकडे तक्रार करणारगरवारे कंपनीच्या बॉयलरमुळे गावात प्रदुषणाचा धोका वाढला आहे. बॉयलरमधून पडणाºया धूर व काजळीमुळे घसा व श्वसनाचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात लवकरच ग्रामपंचायतीचे ठराव पारीत करुन या विषयी प्रदुषण मंडळाकडे तक्रार केली जाणार असल्याचे माजी उपसरपंच खालेदखॉ पठाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर ढोले, लक्ष्मण पाठे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.