वाळूज महानगर : वारंवार मागणी करुनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने सीतानगर व सलामपुरे नगर भागातील नागरिकांनी शुक्रवारी मराठा मावळा संघटनेच्या नेतृत्वाखाली वडगाव ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी एम.बी. ढाकणे यांना निवेदन देवून सुविधा पुरविण्याची मागणी केली.
येथील सीतानगर व सलामपुरे नागरी वसाहत भागात पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी नागरी सुविधांची वानवा आहे. याविषयी अनेकवेळा मागणी करुनही ग्रामपंचायतीकडून सुविधा पुरविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
कच्चे रस्ते असल्याने पावसाळ्यात चिखल तुडवत ये-जा करावी लागते. आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी मिळते. पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी परिसरात भटकंती करावी लागते. ड्रेनेजची गंभीर समस्या आहे.
ड्रेनेजलाईनची सोय नसल्याने ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असून सांडपाणी घरालगत रस्त्यावर साचत आहे. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासाचा प्रार्दुभावही वाढला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने घाणीमुळे रोगराई पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वारंवार सांगूनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने त्रस्त नागरिकांनी शुक्रवारी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. संतप्त नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी एम.बी. ढाकणे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामपंचायतीकडून सुविधा मिळत नसल्याने रोष व्यक्त केला. यावेळी नागरिकांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देवून नागरी सुविधा देण्याची मागणी केली.
ग्रामविकास अधिकारी ढाकणे यांनी ग्रामपंचायतीकडून लवकरच सुविधा पुरविल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी संतोष धांडे, सुभाष सोनवणे, हरिश्चंद्र रामदासी, दीपक आदमाने, सुजित म्हस्के, बाबुराव साखरे, बाबासाहेब सिरसाठ, राजेंद्र निरफळे, राजू जाधव, दिनेश तुपे, संजय चव्हाण, विजया तारे, रंजना इंगळे, विद्या पाईकराव, लता शिंदे, रेखा पाईकराव, सुनिता सिरसाट, अर्चना ताटे, दीपाली नांदवे, मीना सातदिवे, राही काकडे, अल्का म्हस्के, रेखा शेजुळ, अनिता गोरे, राधा धांडे, करुणा जायभाये आदी उपस्थित होते.