वाळूज महानगर : वाळूजला सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करुनही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यालयात जबाबदार अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यालाच निवेदन देवून माघारी परतावे लागले.
वाळूजला काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा वाढला आहे. त्यात वीज सारखी गुल होत असल्याने नागरिकांना गर्मी बरोबरच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विजयनगर व पत्रा कॉलनी भागात तर विजेची समस्या आहे. या भागाला कमी दाबाने विजपुरवठा होत केला जात आहे. पाण्याच्या मोटारी चालत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने या भागाला थ्री फेज वरुन विजपुरवठा करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. मात्र याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विजयनगरातील रहिवाशांनी बुधवारी थेट महावितरण कार्यालय गाठले.
मात्र, कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करुन तेथील कर्मचारी दराडे यांना निवेदन दिले. ८ एप्रिल पर्यंत विजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी रतन अंबिलवादे, सुलेमान शेख, विठ्ठल त्रिभुवन, बशीर पठाण, रज्जाक शेख, सीमा थोरात, शोभा जाधव, शिल्पा जाधव, सोनाली हिवाळे, छाया त्रिभुवन, मनिषा हिवाळे, सुजाता बागुल, संगीता त्रिभुवन, शालू थोरात, सुरेखा वंजारे, जया थोरात, सविता त्रिभुवन आदी उपस्थित होते.या प्रकरणी वाळूज महावितरण केंद्राचे अभियंता महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.