औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम, सभा, रॅली आदी कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळून आरोग्याची काळजी घ्यावी. घरूनच अभिवादन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात अंतिम बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष सचिन निकम, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ढोकळ, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे गुणरत्न सोनवणे, भीमशक्ती संघटनेचे संतोष भिंगारे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
---
योग्य नियोजन करून परवानगी देण्याची मागणी
गर्दीचे आणि अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व आंबेडकरी नेत्यांच्या वेळेचे नियोजन करावे. शासकीय चौकटीत बसवून हा कार्यक्रम घ्यावा. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. नामांतर शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करावा. पार्किंग, पिण्याचे पाणी, अभिवादन सभेसाठी कोरोनाच्या सूचना देऊन परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे सचिन निकम यांनी सांगितले.