करमाड : नागरिकाला मारहाण करणाऱ्या फौजदार शरदचंद्र रोगडे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी उपसरपंचासह नागरिकांनी मंगळवारी करमाड पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मंगळवारी बंद पाळला.
करमाड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रोडगे सोमवारी दुपारी एक वाजता रेल्वेस्टेशन परिसरात गेले होते. तेथे त्यांनी दामू भावले यांना शिवीगाळ करुन त्यांच्या घराचा दरवाजा व खिडकी तोडली. या प्रकाराची माहिती भावले यांनी उपसरपंच दत्तात्रय उकर्डे यांनी दिली. परंतु दुसºया दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी सकाळी दामू भावले उभे असताना रोडगे यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे संतप्त झालेले उकर्डे शेकडो ग्रामस्थ रोडगे यांना जाब विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले.
ग्रामस्थांनी रोगडे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलीस निरीक्षक अजित रायकर व पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक आमले यांनी ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यात यश आले नाही.
अखेर दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून रोडगे यांना निलंबित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.