औरंगाबाद : नागरिकांनो, भविष्यातील गुंतवणूक म्हणून तुम्ही घेतलेल्या प्लॉटवर भूमाफियांची नजर आहे. बोगस जीपीए करून खरेदीखत करण्यासाठी भूमाफियांची टोळी सक्रिय झाली असून, बनावट आधारकार्ड आधारे हा गोरखधंदा सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक शुल्क विभागातील आधार लिंक सर्व्हर बंद पडल्यामुळे बोगसगिरीला आळा घालणे अवघड झाले आहे. प्रभारी सहदुय्यम निबंधक कविता कदम यांच्या सतर्कतेमुळे बोगस जीपीएचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, चार आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.
१९९० ते २००० सालापर्यंत शहरात आजूबाजूला नागरिकांनी गुंतवणूक म्हणून प्लॉट घेतलेले आहेत. त्या प्लॉटची बोगस कागदपत्रे तयार केली जातात. मूळ मालकाच्या जागी बोगस आधारकार्डसह मुद्रांक नोंदणी कार्यालयात मालक उभा करून मुखत्यारनामा (जीपीए) करून घेणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. विशेष म्हणजे या टोळीतील प्लॉट, जमीन शोधणारे हे स्थानिक आणि जीपीए करून देणारा नागरिक बाहेरच्या जिल्ह्यातील असतो. मूळ मालकाच्या लक्षात येण्यापूर्वीच बोगस जीपीएच्या आधारे प्लॉट, जमिनीचा व्यवहार होऊन तेथे तिसऱ्याच व्यक्तीचा ताबा असतो. मुद्रांक कार्यालयातील आधार लिंक सर्व्हर बंद असल्यामुळे बोगस आधारकार्डच्या आधारे काही इतर व्यवहार झाले आहेत काय, हे तपासण्याची वेळ सध्या आली आहे.
नांदेडची महिला; बीडबायपास परिसरातील जीपीएनांदेडच्या एका वृद्ध महिलेचे कुमारी असल्याचे बोगस आधारकार्ड दाखवून बीडबायपास परिसरातील जीपीए करण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात झाल्याचे दुय्यम सहनिबंधक कदम यांनी सांगितले. या महिलचे नाव, वय आणि आधारकार्डवरून संशय आल्यामुळे त्यांना समक्ष बोलविले असता ते आले नाहीत. आधारकार्ड बोगस असून, त्याचे क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याचे लक्षात आले. दरम्यान, जीपीएचे पेपर्स येथे ठेवून संबंधितांनी पळ काढला. या पेपर्सच्या आधारे पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.