वाळूज महानगर: थकित पाणीबील वसुलीसाठी म्हाडा प्रशासनाने चक्क नागरी वसाहतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. म्हाडा कॉलनीत पंधरा दिवसांपासून निर्जळी सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.
तीसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीत जवळपास दोन हजार नागरिक राहतात. या वसाहतीला म्हाडा प्रशासन सिडकोकडून पाणी विकत घेवून ते पुरविते. तर या भागातील रहिवासी म्हाडाकडे पाणीबीलाचा भरणा करतात. वसुलीसाठी प्रशासनाने एक कर्मचारीही नेमला होता. पण, काही दिवसांपासून वसुली कर्मचारी येत नाही. त्यामुळे रहिवशाांना पाणीबिल भरण्यासाठी शहरातील म्हाडा कार्यालयात जावे लागत आहे.
येथील बहुतांशी लोक कामगार आहेत. कामाची व म्हाडा कार्यालयाची एकच वेळ असल्याने नागरिकांना वेळेवर बील भरणे अवघड होत आहे. काहींनी बीलाचा भरणा केला आहे. तर अनेकांकडे बील थकित आहे. थकित बिलाचा आकडा वाढल्याने प्रशासनाने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वेळेवर बील भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
आठवडाभरापूर्वी येथील रहिवाशांनी म्हाडा प्रशासनाला भेटून पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती. पण संपूर्ण वसुली झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुरु केला जाणार नाही, अशी भूमिका म्हाडा प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावर नागरिकांना वेठीस न धरता प्रशासनाने पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य वैशाली हिवाळे यांनी केली आहे.
पंधरा दिवसापासून निर्जळी..म्हाडा प्रशासनाने पाणी बंद केल्याने म्हाडा कॉलनीत मागील पंधरा दिवसापासून निर्जळी सुरु असल्याने पाण्याचा ठणठणाट आहे. त्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पैसे देवूनही वेळेवर पाण्याचे टँकर मिळत नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी शिवाजी हिवाळे, शिवाजी राऊत, संजय जगताप, दादासाहेब रगडे, दिनेश खिराडे, अशोक वानरे आदींनी केली आहे.दोन दिवसांत पाणीपुरवठा होणारपाणी बिलापोटी नागरिकांकडे १४ लाखांवर बील थकित आहे. वारंवार नोटिसा बजावूनही नागरिक वेळेवर पैसे भरत नसल्याने हा आकडा वाढत आहे. बील न भरल्याने सिडकोने पाणीपुरवठा बंद केला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होऊ नये म्हणून पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरु केला जाईल.- सुधाकर बाहेगावकर, उप अभियंता,म्हाडा---------------------------------------------