शहरात दाखल होणारे ११ जण पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. शनिवारी केलेल्या तपासणीत अकरा जण बाधित आढळून आले. २० मार्च ते ३० एप्रिल दरम्यान शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर ५४ हजार ३४० जणांची अँटिजन पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात २८३४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे लक्षात आले. २८३४ व्यक्ती शहरात आल्या असत्या तर त्यांच्यापासून कोरोना संसर्गाचा फैलाव झाला असता व रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती.
संचारबंदीत फिरणाऱ्या ८६ जणांची कोरोना तपासणी
औरंगाबाद : संचारबंदीत अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे असे सांगण्यात आलेले असतानाही अनेक नागरिक बाहेर फिरत आहेत. शनिवारी ८६ नागरिकांची कोरोना तपासणी केली. त्यामध्ये फक्त एक जण बाधित आढळून आला.
आज ''शब-ए-कद्र''
औरंगाबाद : मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या रमजान महिन्यातील शेवटचा खंड संपत आलेला आहे. रविवारी सायंकाळी मुस्लीम बांधव ''शब-ए-कद्र'' साजरी करणार आहेत. कोरोना संसर्गामुळे मुस्लीम बांधवांना घरातच विशेष नमाज अदा करावी लागणार आहे. कोरोना मुक्तीसाठी यावेळी मुस्लीम बांधव दुवा करणार आहेत.