- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : खड्डेमय रस्ते आणि वेगाने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येने शहरात वायू प्रदूषण वाढत आहे. या परिस्थितीत वर्गीकरण न करताच कचरा पेटवण्याच्या प्रकाराची भर पडली. तब्बल तीन महिन्यांपासून शहरातील विविध भागांत कचरा पेटविण्याचा उद्योग सुरू असल्याने शहराची वातावरण बिघडून गेले आहे. हवेचे प्रदूषण ६५ वरून ८५ मायक्रो गॅ्रम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचले आहे. हीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात शहरातील हवेचे प्रदूषण विहित मर्यादा ओलांडण्याचा धोका आहे.
शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडीचा प्रश्न निर्माण झाला. शंभर दिवस उलटूनही हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. शहरात तीन महिने विविध भागांमध्ये दिवस-रात्र कचरा जाळण्यावर भर देण्यात आला. नागरिकांबरोबर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही कचरा सर्रास जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी वेस्ट, प्लॅस्टिकचे तुकडे, अशा सर्वच प्रकारचा कचरा एकत्रित जाळण्याचा उद्योग झाला. रात्रभर धुराचे लोट वातावरणात मिसळले गेले. परिणामी, त्या धुरातून बाहेर पडणऱ्या विषारी वायूंनी पर्यावरणाचा समतोल बिघडविण्यास हातभार लावला.
जिल्हाधिकारी कार्यालय, गारखेडा - कडा कार्यालय आणि औरंगपुरा परिसर येथे वातावरणातील हवेची गुणवत्ता मोजणारे नोंदणी केंद्र आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००७ मध्ये ही यंत्रणा उभारली. तीन महिन्यांपूर्वी ६५ ते ७० मायक्रो गॅ्रम प्रति घनमीटर असलेले हवेचे प्रदूषण आज ८५ मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचल्याचे या यंत्रणेवरून समोर आले आहे. शहराच्या प्रदूषण पातळीत तब्बल १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, अनेक घटकांप्रमाणे कचरा जाळणे हा घटकही कारणीभूत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विहित मर्यादा ओलांडण्याचा धोकाहवेतील तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण १०० मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर असावे, असा मानक आहे. आगामी काही दिवसांत ही विहित मर्यादा ओलांडण्याचा धोका व्यक्त होत आहे. कचरा जाळल्यामुळे सल्फर, पारा, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड असे घातक वायू वातावरणात प्रवेश करतात. हे वायू श्वसनासोबत थेट शरीरात जाऊन श्वसन क्रियेवर परिणाम करतात. यामुळे हृदयावरही परिणाम होऊ शकतो. दमा, अस्थमा हे आजार असणाऱ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि लहान बालकांसाठी हे वायू अत्यंत घातक आहेत. डोळे चुरचुरणे, मळमळणे, डोके जड पडणे, अंगावर रॅश येणे, असे आजारही या धुरामुळे होऊ शकतात. गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कृती आराखडा तयार आहेवायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. कचरा जाळण्यामुळे हवेच्या प्रदूषणात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे; परंतु ही वाढ विहित मर्यादेत आहे. ही मर्यादा ओलांडली गेली तर दूरगामी परिणाम होऊ शकतात. सध्या तरी तशी परिस्थिती नाही.- ज. अ. कदम, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ