औरंगाबाद : भारतरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी घरा-घरात आणि बुद्धविहारात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. घरा-घरावर फडकणारे निळे ध्वज, निळ्या रंगाचे प्रवेशद्वार, पताका पाहून ‘निळी ही नगरी झाली निळ्या आभाळाखाली’ असेच काहीसे चित्र दिसत होते.
भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मंगळवारी रात्रीपासून धावणारे रस्ते बुधवारी रात्री लॉकडाऊन लागेपर्यंत अबाल-वृद्धांनी वाहत होेते. येणारा प्रत्येक भीमअनुयायी, ‘तू इतकं दिलं आम्हाला, कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं...’ असे गुणगुणत होते.
गेले वर्षभर कोरोनाने समाजमनावर दाटलेले मळभ या चैतन्याच्या सोहळ्याने किमान २४ तासासाठी तरी दूर केले. लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते, ख्यालीखुशाली विचारत होते. परंतु मुखी मास्क होता आणि हातावर सॅनिटायझरही टाकले जात होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती उत्सवाला मंगळवारी रात्री १२ पासूनच सुरुवात झाली. १२ वाजताच नागरिकांनी जोरदार आतषबाजी केली. अवघे आसमंत विविध रंगांनी उजळून निघाले होते. त्यानंतर रात्रीच बुद्धविहारातून बुद्धवंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. बुधवारी पहाटेपासून शहरातील बहुतांश वसाहतींमधून अभिवादन सभा पार पडल्या. भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनेकांनी रात्रीच प्रयाण केले. बुधवारी दिवसभर आंबेडकरी अनुयायांनी येथे अभिवादनासाठी रांगा लावल्या होत्या. तेव्हा त्यांची शिस्तही दिसत होती. यात विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी, कामगार, कर्मचारी, तरुण, तरुणी आदी सर्वांचाच भरणा होता. पुतळ्याच्या चौथऱ्याशी पुष्पहारांचा ढीग स्पर्धा करत असल्याचे दिसत होते. विविध वसाहतींतून भीमसैनिकांचे लहान-मोठे जथे येत होते. ‘जब तक सुरज चाँद रहेगा, बाबा तुम्हारा नाम रहेगा’च्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता. ढोल-ताशे, वाद्ये नसतानाही तरुणाईत संचारलेला उत्साह अमाप होता. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरेही अनेक वसाहतींमधून घेण्यात आली. दिवसभर समाजमाध्यमे जयंतीमय झाली होती.