जालना : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तात्काळ कळावे म्हणून शहरात ३८ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण तसेच प्रक्षेपण पोलिस नियंत्रण कक्षात होते. मात्र, काही दिवसांपासून बहुतांश कॅमेरे बंदावस्थेत आहेत. परिणामी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगर पालिकेचे याकडे दुर्लक्ष असल्याने जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का हाच खरा प्रश्न आहे. . नगर पालिका व पोलिस दलाने शहरातील ३५ चौकांत ७० सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. हे सर्व सीसीटीव्ही सौर ऊर्जेवर चालणारे आहेत. याच्या देखभालीची जबाबदारी ही नगर पालिका प्रशासनाकडे होती. सुरूवातीचे काही दिवस देखभाल करण्यातही आली. मात्र, आता काही दिवसांपासून बहुतांश सीसीटीव्ही बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने त्यातून होणारे चित्रीकरण थांबले आहे. शहरातील मामा चौक, सिंधी बाजार, अलंकार, औरंगाबाद चौफुली, सुभाष चौक, अंबड चौफुली, शनि मंदिर, मोती बाग, फुल बाजार, सराफा आदी ठिकाणी दोन ते तीन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्या कॅमेऱ्यांव्यतिरिक्त नवीन कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. प्रस्ताव अंमलात न आल्याने नवीन कॅमेरे अद्याप बसविण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)कॅमेऱ्यांतून होणारे चित्रिकरण थांबल्याने काही मोठी दुर्घटना अथवा अपघात घडल्यास पोलिसांना तपास करणे जिकिरीचे होत आहे. शहरातील महत्त्वाच्या आठ ते दहा ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत. पोलिस नियंत्रण कक्षात सदर कॅमेऱ्यांचे नियंत्रण आहे. मोठ्या टीव्ही स्क्रिनवर शहरावर लक्ष ठेवले जाते. ४सद्यस्थितीत हे कॅमेरे बंद असल्याने समस्येत भर पडली आहे. पोलिस नियंत्रण कक्षासोबतच नगर पालिकेतही या कॅमेऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. परंतु पालिकेत किती नियंत्रण ठेवले जाते, हा संशोधनाचा विषय आहे. नगर पालिकेने कॅमेरे बसविल्यापासून लक्ष दिले नाही. परिणामी कॅमेरे नादुरूस्त झाले आहेत. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह म्हणाल्या, नगर पालिकेने कॅमेऱ्यांची दुरूस्ती करावी, म्हणून पालिकेला पत्र देण्यात आले आहे. डीपीसीच्या निधीतून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित असून, हे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
शहरातील सीसीटीव्ही बंदावस्थेत!
By admin | Published: July 12, 2016 12:39 AM