लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : झालर क्षेत्रातील गावक-यांनी एकत्र येऊन शुक्रवारपासून नारेगाव कचरा डेपोच्या बाजूला मांडकी शिवारात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुस-या दिवशीही गावक-यांनी एकही कच-याचा ट्रक कचरा डेपोत जाऊ दिला नाही. शनिवारी सकाळी आयुक्त, महापौरांसह अनेकांनी आंदोलकांसोबत शिष्टाईचा जोरदार प्रयत्न केला. मात्र गावकरी कचरा डेपो हटाव या मुख्य मागणीवर ठाम आहेत. शुक्रवारी उचलेला कचरा मध्यवर्ती जकात नाक्यावर ट्रकमध्ये जशास तसा आहे. शनिवारी कचरा उचलून टाकायचा कोठे, असा प्रश्न महापालिकेला पडला होता. रविवारी सुटी असल्याने शहरातील कचरा उचण्यात येणार नाही.नारेगाव कचरा डेपोत दररोज ४०० मेट्रिक टन कचरा नेऊन टाकण्यात येतो. या कच-यावर मनपा कोणतीही प्रक्रिया करीत नाही. त्यामुळे या भागात कच-याचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. कचरा डेपोमुळे आसपासचे जलसाठे दूषित झाले आहेत. प्रदूषणाचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण झाला आहे. नारेगावच्या आसपास असलेल्या १५ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन शुक्रवार सकाळपासून जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी एकही कच-याचा ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ दिला नाही. शुक्रवारी मनपा अधिकारी व पदाधिका-यांनी आंदोलकांची बरीच समजूत घालती. शेवटी सायंकाळी नक्षत्रवाडी येथे मनपाच्या जागेवर कचरा टाकण्याचा निर्णय झाला. नक्षत्रवाडीतही विरोध झाल्याने कुठेच कचरा टाकता आला नाही.
शहरात कचरा कोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:30 AM