----
शासनाकडून १८२ एकर जमिनी मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाकडून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण केले जाईल. विस्तारीकरणाचा फायदा होईल, मात्र, आजही विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानसेवा, कार्गो सेवा देण्यासाठी सक्षम आहे. त्यासाठी फक्त विमान कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्राधिकरणासह सर्वजण प्रयत्न करीत आहेत.
--------
कोरोनापूर्वी विमानसेवेत वाढ झाली होती. मात्र, कोरोनामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. हळूहळू विमानसेवेत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. केवळ तिसरी लाट येऊ नये, अथवा त्याचा प्रभाव कमी रहावा, अशी अपेक्षा आहे. आता लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विमान प्रवास करता येत आहे. आरटीपीसीआर तपासणीची गरज नाही.
विमान कंपन्यांनी पुढाकार घेतला तर तत्काळ आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू होऊ शकते. शिवाय प्रवासीसंख्या वाढली तर विमानांची संख्याही वाढेल, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होऊ शकेल. विस्तारीकरणात धावपट्टी वाढेल, टॅक्सी वे होईल. मात्र, आजही आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण करण्यास विमानतळ सज्ज आहे. दुबई, बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे होती, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि सगळे ठप्प झाले. यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहे. कनेक्टिंग फ्लाइटद्वारेदेखील आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल, यासाठीही प्रयत्न केला जात आहे.
हे विमानतळ सध्या तासाला २ ते ३ विमाने हाताळू शकते. म्हणजे दिवसभरात ३० विमाने येऊ शकतात आणि जाऊ शकतात, ऐवढी क्षमता आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांनी पुढे आले पाहिजे. त्याबरोबर अधिकाधिक नागरिकांनी प्रवास केला पाहिजे. कार्गो पाठविण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेतला पाहिजे.