लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचे अखेर महानगरपालिकेने जाहीर केले असून आता ओल्या व सुक्या कचºयाचे विलगीकरण करुन त्याचे खत तयार करण्यासाठीच्या दुसºया टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत परभणी शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. याला काही ठिकाणी यशही मिळत आहे. गेल्या महिन्यात मनपाची विशेष सर्वसाधारण सभा घेऊन शहर हगणदारीमुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या अनुषंगाने शुक्रवारी महानगरपालिकेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात परभणी शहर प्रथम टप्प्यात हगणदारीमुक्त झाल्याचे नमूद करण्यात आले असून याबाबत सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले आहेत. या अभियानाचा दुसरा टप्पा म्हणून कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करुन त्याचे खत तयार करणे व झिरो वेस्ट मॅनेजमेंट करणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठी मनपाच्या वतीने घंटागाडीमार्फत घरोघरी जाऊन कचरा उचलताना ओला व सुका असा वेगळा जमा करुन या कचºयावर प्रक्रिया करुन तो पुनर्वापरात आणण्याचा मनपाचा मानस आहे. या अनुषंगाने तीन टप्पे पाडण्यात आले असून त्यामध्ये कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांना याबाबत माहिती देणे, घंटागाडी सोबत प्रतिनिधी उभा राहून नागरिकांनी दिलेल्या कचºयाचे योग्य विलगीकरण होते की नाही, याची पडताळणी करणे, डपिंग/कंपोस्टींग साईटवर होत असणाºया प्रक्रियेवर देखरेख करणे, हा या मागचा हेतू आहे. या अनुषंगाने २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता सुजान नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, संस्था, संघटना, विविध क्लबचे प्रतिनिधी आदींची मनपात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत या अभियानाची रुपरेषा ठरविली जाणार आहे.शहर हगणदारीमुक्त करण्याचा मनपाने केलेला संकल्प स्तुत्य असला तरी प्रत्यक्षात शहर हगणदारीमुक्त झाले की नाही, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.१८ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ने शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या स्थितीबाबतचे स्टिंग आॅपरेशन केले होते. या स्टिंग आॅपरेशनमध्ये बºयाच ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयाचे काम अर्धवट असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी या सार्वजनिक शौचालयाचे आऊटलेट रिकाम्या जागेत सोडल्याचे आढळून आले तर काही ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या पाळूवर सार्वजनिक शौचालय उभा करुन त्याचे पाईप या कालव्यात सोडल्याचे निदर्शनास आले. याशिवाय मनपाने जाहीर केलेल्या हगणदारी स्थळांवर आजही उघड्यावर जाणाºयांची संख्या दिसून येत आहे.उदाहरणच घ्यायचे असेल तर दूरसंचार कार्यालयाच्या बाजुला असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील बाजुला आजही अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर शौचास जात आहेत. तरीही मनपाने शहर हगणदारीमुक्त जाहीर केले आहे. त्यामुळे मनपाचा हेतू चांगला असला तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी असल्याचे दिसून येत आहे.
शहर हगणदारीमुक्त झाल्याचे मनपाने केले जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:12 AM