औरंगाबाद : औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराच्या विकासासाठी मला गतीने बरीचशी कामे करता आली. बरेचसे काही करावयाचे राहूनही गेले. त्या योजना व कल्पना मला नागपुरात नक्कीच उपयोगी पडणार आहेत, असे उद्गार आज येथे औरंगाबाद मनपाचे मावळते आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांनी काढले. आपल्या वीस महिन्यांच्या कारकीर्दीत डॉ. कांबळे यांनी बाराशे कोटींच्या कामांची सुरुवात केली. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, एलईडी व मनपा शाळांच्या निकालात ८० टक्के वाढ, अशा काही ठळक बाबींचा उल्लेख करता येईल व यासाठी औरंगाबादकर नेहमीच त्यांना आठवणीत ठेवतील. संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. मानपत्र, शाल व पुष्पहार देऊन माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या हस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संत एकनाथ रंगमंदिर तुडुंब भरले होते. शिवाय अनेक संस्था- संघटना व व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहून डॉ. हर्षदीप कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. कांबळे यांच्या आई जोहर व वडील श्रीराम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.