औरंगाबाद: दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपानंतर केंद्र शासनाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासह (पीएफआय) संलग्न संस्थांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफआयच्या जुना बायजीपुरा भागातील कार्यालयाला पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सील ठोकण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवादविरोधी पथकाने पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर धाडी टाकत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यातील देशविरोधी कृत्यात सहभागी असलेल्यांना गुन्हे नाेंदवित अटक करण्यात आली आहे. देशभराच्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी घेतला आहे.
त्यानुसार केंद्र शासनाने याविषयी २९ सप्टेंबर रोजी राज्य शासन व केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील पीएफआयची कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले. त्या आदेशान्वये पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी जुन्या बायजीपुऱ्यातील पीएफआयचे कार्यालय सील करण्याचे आदेश दिले.