औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या पक्षांतील राजकीय मंडळींना विधानसभा निवडणुका जवळ येताच पदोन्नतीचे वेध लागले आहेत. मनातील सुप्त इच्छा रविवारी रात्री एका अराजकीय व्यासपीठावर अनेकांनी व्यक्त केलीच. उद्योगमंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांना कॅबिनेट करण्याची मागणी करण्यात आली. त्यात संजय शिरसाटही मागे नव्हते. एरव्ही नाही, नाही, म्हणणारे महापौर नंदकुमार घोडेले यांनीही पदोन्नतीची इच्छा व्यक्त केलीच.
शहरातील बांधकाम व्यावसायिक क्रेडाई संघटनेचा पदग्रहण सोहळा रविवारी रात्री आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वप्रथम संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा यांनी राजकीय फोडणीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणात उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांना पुढच्या वेळेस कॅबिनेट मंत्री करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, भाजपच्या राष्ट्रीय नेत्या विजया रहाटकर यांच्याकडे केली. हाच धागा पुढे संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात पकडला. या दोघांचा पदोन्नतीचा विचार होतोय... माझा कोणीच विचार करीत नाही. जबिंदा पदोन्नत्यांची शिफारस करणार, हे अगोदर माहीत असते, तर मी उद्धव ठाकरे यांनाच कार्यक्रमाला बोलावले असते... हंशा... शिरसाट यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे, इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे’ असा उल्लेख करताच सभागृहात खसखस पिकली.
शिरसाट यांच्यापाठोपाठ भाषणाची संधी महापौरांना मिळाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून विधानसभा नको रे बाबा म्हणणारे महापौरांच्या मनातील ओठांवर आलेच. राजेंद्रसिंग जबिंदा माझ्या पदोन्नतीबद्दल काहीच बोलले नाही... शेवटी पदोन्नतीच्या मुद्यावर विजया रहाटकर म्हणाल्या की, काम करणाऱ्यांना आपोआप संधी मिळत असते. अतुल सावे यांनीही चिंता करू नका, होईल प्रमोशन, असे म्हणून विषयाला पूर्णविराम दिला.
जलील-खैरे यांच्यात कलगीतुरासभागृहात व्यासपीठावर सर्व विराजमान झाल्यानंतर माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे आगमन झाले. खा. इम्तियाज जलील यांच्या बाजूला एक खुर्ची रिकामी होती. आ. दानवे यांनी खैरेंना जलील यांच्या बाजूला बसण्याचा इशारा केला. खैरे यांनी नकार देत अंबादास दानवे यांना बाजूला सरकवून खुर्चीवर बसणे पसंत केले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी अगोदर महापालिका दुरुस्त करा, प्रश्न आपोआप सुटतील, असे नमूद केले. सर्वांनी एकत्र यावे, काम करावे, अशी माझी खूप इच्छा आहे. मी प्रयत्न करतोय (खैरे यांच्याकडे पाहत) लोक दूर पळू लागले आहेत. मी जवळ करतोय, ते लांब पळत आहेत. रात्र गेली दिवस उगवला. आता सर्व काही विसरायला हवे... असे आवाहन करताच सभागृहात हंशा पिकला.
खैरेंनी वाचला विकास कामांचा पाढाचंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे मी आजपर्यंत या शहरासाठी काय काय केले, याचा पाढाच वाचला. मनपाला कोणी दोष दिला, तर ते मान्य करणार नाही, समांतरची योजना आणली, भूमिगत आणली. प्रत्येक योजनेवर टीका करून अयशस्वी करण्याचा प्रयत्न होतो. आम्ही मतांची खंडणी मागतो, पैशांची नाही. यंदा तुम्ही (बिल्डर) विसरले... असे म्हणताच सभागृहात जोरदार हंशा पिकला. मागील ३० वर्षांमध्ये मी जे केले, तसे काम इतरांनी (जलील) करून दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. आजही मला तीच किंमत आहे, असा दावा खैरे यांनी केला.