औरंगाबाद : केंद्र शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आठ दिवसांपूर्वी सुरू केले. या उपक्रमाला तरुणाईकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद शहरात मागील सात दिवसांमध्ये जवळपास ७४ हजार नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे महापालिकेकडील लसींचा साठा शनिवारी संपला. रविवारी साठा येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. साठा न आल्यास सोमवारी मनपाला लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागणार आहे.
केंद्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरात २२ जूनपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात सुरूवात करण्यात आली. या निर्णयामुळे तरुणाई लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहे. शुक्रवारी शहरात तब्बल १७ हजार नागरिकांनी लस घेतली. यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक होते. आठ दिवसांपूर्वी मनपाकडे ५४ हजार लसचा साठा होता. शनिवारी सायंकाळी हा साठा संपला. रविवारी आठ ते दहा हजार लस मिळतील अशी शक्यता आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केली.
शहराने ओलांडला चार लाखांचा टप्पा
हेल्थलाईन वर्कर-पहिला डोस-२८,०२६
दुसरा डोस-१५,९२९
.....................................
फ्रन्टलाईन वर्कर-पहिला डोस- ३७,५२८
दुसरा डोस-१८,१८१
........................................
१८ ते ४४ वयोगट- पहिला डोस- ९०,६६७
दुसरा डोस-२,१७५
...............................
४५ ते ४९ विविध आजाराचे नागरिक- पहिला डोस-९४,८०२
दुसरा डोस-२७,२२६
.....................................
६० वर्षांवरील नागरिक-पहिला डोस- ६६,२७२
दुसरा डोस-२९,३५४