औरंगाबाद : अनलॉकमध्ये काही निर्बंध असले तरी रस्त्यावरील वर्दळ कमी झालेली नाही. रस्त्यांवर रिक्षाही मोठ्या संख्येने धावताना दिसत आहेत. जालना रोड, जळगाव रोड, नगर रोडवर रिक्षा खचाखच प्रवाशांनी भरून पळविल्या जात आहेत. या रिक्षांमध्ये प्रवाशांसह स्वत:चाही जीव धोक्यात घातला जात आहे. प्रवासी आणि चालकही विनामास्कच दिसत आहेत. कोरोना संसर्गाचा धोका विसरून वाहतूक सुरू आहे.
-----------------
शहरात दुचाकीवर
‘ट्रीपल सीट’ सुसाट
औरंगाबाद : मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर फक्त दोनच प्रवासी सुरक्षित (हेल्मेट घालून) प्रवास करू शकतात. परंतु शहरात दुचाकीवर ‘ट्रीपल सीट’ हा नवीन पायंडा पडलेला दिसत आहे. शहरात जाण्यासाठी दोन दुचाकी घेऊन जाण्यापेक्षा पेट्रोलची बचत करण्याच्या हेतूने जीवघेणा ‘ट्रीपल सीट’ प्रवास केला जात आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवून वाहतूक पोलिसांसमक्ष ही वाहने पळविली जात आहेत. ‘ट्रीपल सीट’ जाणाऱ्या या वाहनांवर ‘स्मार्ट सिटी’च्या तिसऱ्या डोळ्याचीदेखील नजर दिसत नाही.
---------------------
शहरात फुगे विक्री
करणाऱ्यांची वाढतेय संख्या
औरंगाबाद : व्यवसाय करणाऱ्यांना नवनवीन कल्पना सुचतात. वाहतूक सिग्नलवर किंवा शहराच्या विविध चौकात विविधरंगी फुगे विक्री करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. लाॅकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत किंवा रोजगार मिळेनासा झाला आहे. यावर मार्ग म्हणून आता शहरात फुगे विक्रीचा व्यवसाय आणि विक्रेतेही वाढत आहेत. पाच ते दहा रुपये दराने फुग्यांची विक्री होते. अनेक चारचाकी वाहनधारकही पाच ते दहा फुगे खरेदी करत असल्याचे चित्र आहे.