औरंगाबाद : शहरातील १७ लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागावर आहे. अग्निशमन विभागात सध्या ११३ कर्मचारी कार्यरत असून, त्यातील केवळ १३ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. २०१४पासून महापालिकेने अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच दिलेले नाही. यातील धक्कादायक बाब म्हणजे सध्या कार्यरत असलेले ८० टक्के कर्मचारी हे कंत्राटी आहेत.
शहर आणि परिसरातील मालमत्तांना आग लागण्याच्या घटना वर्षभरात किमान दीड ते दोन हजार होतात. त्यामुळे आग लागल्यानंतर सर्वात पहिला फोन अग्निशमन विभागाला येतो. या विभागातील अधिकारी, कर्मचारी हे घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचे काम करतात. परंतु, शहरातील अग्निशमन विभागात तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचारीच नाहीत. २०१४मध्ये महापालिकेने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना नागपूर येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. एका कर्मचाऱ्याला किमान सहा महिने याठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागते. नागपूर येथे प्रशिक्षण घेतलेले अवघे १३ कर्मचारी सध्या अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. उर्वरित प्रशिक्षित कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मागील दोन दशकांपासून महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. अग्निशमन विभागात कायमस्वरूपी ४३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, सध्या ३९ रिक्त पदे असून, कंत्राटी पद्धतीवर जवळपास ७० कर्मचारी भरण्यात आले आहेत.
निधी नसल्याने यंत्रसामग्रीचा अभावशहरात इमारती गतीने वाढत आहेत. त्या तुलनेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही. चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील आग विझवताना अग्निशमन कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे चौथ्या मजल्यापर्यंत जाण्याएवढी शिडीसुद्धा नाही.
९० टक्के कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले नाहीअग्निशमन विभागात कुशल, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येते. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झालेले नाही त्यांना नागपूर येथील प्रशिक्षण संस्थेत पाठविण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कर्मचाऱ्यांना कोणतेही शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलेले नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले नसल्यामुळे आग विझवणे, आपत्ती व्यवस्थापनात कशा पद्धतीने काम करावे याचा अनुभव नाही. औरंगाबाद महापालिकेकडे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे.
नवीन आकृतीबंधानुसार भरती होणारमहाराष्ट्र शासनाने महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधामध्ये २८१ पदांना मंजुरी दिलेली आहे. यापूर्वी एकदा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यातील बहुतांश कर्मचारी आता निवृत्त झाले आहेत. नवीन पदभरतीनंतर पुन्हा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.- आर. के. सुरे, अग्निशमन अधिकारी, मनपा.
अग्निशमन विभागातील मंजूर रिक्त पदेपद - मंजूर - रिक्त - कंत्राटीमुख्य अग्निशमन अधिकारी - ०१ - ०० - ००टेन्शन ऑफिसर - ०१ - ०० - ००सुपर अग्निशमन अधिकारी - ०६ - ०३ - ००प्रमुख अग्निशामक - ०७ - ०० - ००ड्रायव्हर ऑपरेटर - १३ - ०५ - ००वाहनचालक - ०५ - ०५ - १०अग्निशामक - ३३ - १८ - ५२टेलिफोन ऑपरेटर - ०७ - ०५ - ०५कनिष्ठ लिपिक - ०२ - ०१ - ००