लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळी या महासणाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहेत. संपूर्ण शहर असंख्य दिव्यांनी उजळून निघाले आहेत. सर्वत्र झगमगाट झाला असून दिवाळीच्या दुसºया दिवशी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने धनत्रयोदशी साजरी करण्यात आली आहे. आता सर्वांना गुरुवारच्या लक्ष्मीपूजनाचे वेध लागले आहेत.धनत्रयोदशीनिमित्ताने शहरात डॉक्टरांनी दवाखान्यात धन्वंतरी देवताचे पूजन केले. यानंतर दवाखान्यातील कर्मचारी, रुग्णांच्या नातेवाईकांना प्रसाद वाटप करण्यात आला. तरुणी व गृहिणींनी घरांसमोर सडारांगोळी करून पहाटेच सणाच्या तयारीला सुरुवात केली. सिटीचौक परिसरातील फुल बाजारातही विविध प्रकारची फुले खरेदीसाठी सकाळी गर्दी झाली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी व्यापारी खतावणी खरेदी करतात. आज शहरातील काही स्टेशनरीच्या दुकानात पूजा मांडली होती. पारंपरिक पद्धतीने गांधी टोपी घालून व्यापारी दुकानात खतावणी खरेदीसाठी येत होते. तिथे लाल रंगातील खतावणीवर हळद-कुंकू वाहिले जात होते. खतावणी विक्रेते ग्राहकांना कुंकवाचा टिळा लावत होते. खतावणी विकत दिल्यानंतर प्रसाद म्हणून बत्ताशेही दिले जात होते. व्यापारीच नव्हे तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी लक्ष्मीचे छायाचित्र असलेल्या लाल रंगाच्या वहीची पूजा केली जाते. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरही शहरवासीयांनी लक्ष्मीच्या वह्या खरेदी केल्या. वहीसोबत लक्ष्मीचे छायाचित्रही दिले जात होते. तसेच लाल रंगाचा पेनही आवर्जून खरेदी केला जात होता. काहींनी सायंकाळी ७.१९ ते ८.१७ वाजेचा मुहूर्त साधत धन्वंतरीची पूजा केली. बाजारपेठेतही आज गर्दी बघण्यास मिळाली. सकाळपासून गर्दी होतीच; पण सायंकाळनंतर या गर्दीत मोठी भर पडली. कपडे,पूजेचे साहित्य, विद्युत माळा, मिठाई, पूजेचे साहित्य खरेदी केले जात होते. आकाशकंदिल खरेदीही केली जात होती. औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली, मछलीखडक, सराफा रोड, सुपारी हनुमान परिसर, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट, उस्मानपुरा, जालना रोड, पुंडलिकनगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजीनगर, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर परिसरात मोठी वर्दळ पाहण्यास मिळाली. सायंकाळी तर पैठणगेट ते मछली खडक रस्त्यापर्यंत चालणे कठीण झाले होते. भाऊबीजपर्यंत खरेदी सुरूराहील, असे व्यापा-यांनी सांगितले.
दिवाळीने शहरात झगमगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:07 AM