लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव येथील शेतक-यांनी शुक्रवार, १६ फेब्रुवारीपासून कचरा डेपो हटाव या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही कच-याची कोंडी कायम आहे. मंगळवारी महापालिका पुन्हा एकदा आंदोलकांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा ‘जोरदार’ प्रयत्न करणार आहे. मागील चार दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यात न आल्याने शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शुक्रवारी जमा केलेला कचरा आजही मध्यवर्ती जकात नाक्यावर वाहनांमध्येच आहे. हा कचरा सडू लागल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे.शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. महापालिका प्रत्येक वॉर्डातील ओला व सुका कचरा नारेगाव येथील कचरा डेपोवर नेऊन टाकत असत. कचरा डेपोमुळे नारेगाव पंचक्रोशीतील नागरिकांना मागील तीन दशकांपासून यातना सहन कराव्या लागत आहेत. चार महिन्यांपूर्वी या भागातील शेतक-यांनी आंदोलन करून मनपाला शेवटचे अल्टिमेटमही दिले होते. महापालिकेने या अल्टिमेटमला फारसे गांभीर्याने घेतले नाही. आता शेतक-यांनी परत एकदा आंदोलनाचे हत्यार उपसल्याने महापालिका संकटात सापडली आहे. मागील चार दिवसांमध्ये मनपाने अनेक प्रयोग करून बघितले. मात्र, एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. नारेगावशिवाय दुसरीकडे कुठेच कचरा टाकता येणार नाही.शनिवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर, महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून आणखी दोन महिने मुदतवाढ द्यावी, अशी नम्र विनंती केली. या विनंतीचा विचार करावा, असेही जिल्हाधिका-यांनी गावक-यांना सांगितले. उद्या मंगळवारी परत गावक-यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. दोन महिने मुदतवाढ मनपा लेखी स्वरूपात देण्यास तयार आहे. त्यामुळे यातून निश्चितच मार्ग निघेल असा विश्वास महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.
शहरात कचराकोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:08 AM