शहरातील हा व्यापारी २०१८ पासून बिटकॉईन या आभासी चलनाची खरेदी- विक्री करतो. टेलीग्रामच्या माध्यमातून हे व्यवहार तो ऑनलाईन करीत होता. कोरोना महामारीमुळे भारतासह अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडल्याने संबंधित व्यापाऱ्याने बिटकॉईनमध्ये अधिक गुंतवणूक केली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टेलीग्रामवरुन त्यांच्याशी संपर्कात असलेल्या एकाने त्यास बिटकॉईनमधून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याच्यासोबत त्यांनी यापूर्वी व्यवहार केले होते. तेव्हा त्याने सर्व व्यवहार प्रामाणिकपणे करून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला होता. त्याने पुन्हा तक्रारदार व्यापाऱ्याशी संपर्क साधून बिटकॉईन त्याच्या खात्यात वर्ग केल्यास तो विद्यमान बाजारभावापेक्षा जास्त नफा मिळवून देईल. त्यातून जास्तीचे बिटकॉईन खरेदी करता येईल, असे आमिष दाखविले. तक्रारदाराचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी टप्प्याटप्प्याने २४ बिटकॉईन आरोपीच्या खात्यात हस्तांतरित केले. मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपीने त्यांना बिटकॉईनची रक्कम दिली ना जास्तीचे बिटकॉईन. अनेकदा संपर्क साधून त्याने केवळ टोलवाटोलवी केल्याचे निदर्शनास आल्याने शेवटी त्यांनी पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी तक्रारदाराला या व्यवहाराविषयी कागदपत्रे, बँक स्टेटमेंट सादर करण्यास सांगितले आहे.
========
कशी होते बिटकॉईनची खरेदी-विक्री
ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बिटकॉईनची ऑनलाईन खरेदी-विक्री होते. बाजारात एका बिटकॉईनची किंमत १२ ते १३ लाख रुपये आहे. असे असले तरी बिटकॉईनचे काही अंश (युनिट ) खरेदी करता येतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ज्याप्रकारे डी मॅट खाते असावे लागते. तसेच स्वतंत्र खाते बिटकॉईन खरेदी-विक्री करण्यासाठी उघडावे लागते. हे खाते उघडल्यानंतर बिटकॉईनची खरेदी-विक्री करता येते, असे सूत्राने सांगितले.
पोलिसांचाही अभ्यास सुरू
बिटकॉईनसंदर्भात तपास करण्याची शहर पोलिसांची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांकडे तीन-चार दिवसांपूर्वी ही तक्रार आली आहे. पोलीस त्या तक्रारीचा अभ्यास करीत आहेत. त्यामुळे याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल झाल्यास तो राष्ट्रीयस्तरावरून आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांची मदत घेऊन होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.