औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये हागणदारीमुक्त शहरासाठी औरंगाबादला ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही शहराला त्याचा फायदा होऊ शकतो.
स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा समावेश पहिल्या दहा क्रमांकांमध्ये असावा, या दृष्टीने महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नियोजन करीत विविध उपक्रम राबवून प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. केंद्र सरकारतर्फे नियुक्त त्रयस्थ संस्थेने १२ ते १५ जानेवारी या काळात शहरातील ५३ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. मध्यरात्री आणि पहाटे तपासणी करण्यात आली. या पाहणीचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला असून, त्यात औरंगाबाद महापालिकेला ‘ओडीएफ डबल प्लस’ मानांकन जाहीर झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील ‘स्टार रेटिंग’ आणि सर्वेक्षणाच्या अंतिम निकालासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेने पडेगाव येथे १० एमएलडी, झाल्टा येथे ३५ एमएलडी, डॉ. सलीम अली सरोवर येथे ५ एमएलडी, कांचनवाडी येथील १६१ एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्लँट (मलजल प्रक्रिया प्रकल्प) उभारले आहेत. 'एसटीपी'मधून रोज सुमारे ६० ते ७० 'एमएलडी' पाण्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी नाल्यात सोडून दिले जाते. शिवाय निर्माण होणारे खत नागरिकांना मोफत दिले जाते. भूमिगत गटार योजना, ‘एसटीपी’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचा फायदा या मानांकनासाठी झाल्याचे भोंबे यांनी सांगितले.
'ओडीएफ डबल प्लस' म्हणजे काय?
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत देशातील शहरे हागणदारीमुक्त व्हावीत, यावर सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे. त्या अंतर्गतच शहरातील कोणत्याही भागात उघड्यावर लघवी किंवा शौच करताना कोणी आढळून येत नाही ना, याची तपासणी केली जाते. त्याशिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालये व्यवस्थित कार्यान्वित असावीत, असाही निकष आहे.
-----
स्वच्छतागृह, एसटीपी प्लँटचे कौतुक
पडेगाव, झाल्टा, डॉ. सलीम अली सरोवर, कांचनवाडी येथील एसटीपी प्लँटच्या (मलजल प्रक्रिया प्रकल्प) कामाबद्दलही कौतुक करीत त्यास ‘ओडीएफ डबल प्लस’ मानांकन देण्यात आले आहे. शहरातील ११ स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यांपैकी पाच स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबद्दल महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कौतुक करीत अन्य स्वच्छतागृहांना ‘स्वच्छता’ हा शेरा दिला आहे.