औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जलवाहिनीसह होणाऱ्या विविध भूमिपूजन कार्यक्रमांना फक्त २०० जणांना निमंत्रित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरवारे स्टेडियमवर गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, शहरात ७० ठिकाणी एलसीडी लावून, सोशल मीडियातून सभेचे प्रक्षेपण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सयुंक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात ७० ठिकाणी एलसीडी लावून मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे, त्या ठिकाणी होणारी गर्दी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी नियंत्रित करणार, यावर जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, त्याबाबत मनपा आणि पोलीस यंत्रणा नियोजन करणार आहे. मुख्यमंत्र्यांचे १२ वाजून ४० मिनिटांनी आगमन होईल. ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते शहरात असतील. मनपासह उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असेल त्यांनाच तेथे येण्यास परवानगी असणार आहे. सीएमओ येथून सभेचा कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. असे मनपा आयुक्त पाण्डेय म्हणाले. पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ ठिकाणी तपासणी होईल. वोखार्डकडील रस्ता या काळात बंद असणार आहे.
मग मुंबईतूनच भूमिपूजन करायचे असते ना
फक्त २०० जणांना निमंत्रण देणे हे काही योग्य नाही. असेच करायचे असेल तर मुंबईतूनच ऑनलाईन भूमिपूजन करायचे असते ना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किमान १ हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था गरवारे स्टेडियमवर करता आली असती. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक, पदाधिकारी मिळूनच २०० जण होतील. सभास्थळी गर्दी नको म्हणताय मग शहरात एलसीडी समोर होणाऱ्या गर्दीला कोरोनाची भीती नाही काय, असा सवाल करीत आ. अतुल सावे म्हणाले, भाजपाच्या कुणाला अद्याप निमंत्रण आलेले नाही. निमंत्रण आले नाहीतर जाणार नाही.