औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारमधील सेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसते आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या राजपटामध्ये पहिल्या चालीत तूर्त एकनाथ शिंदे गटाचा वरचष्मा दिसतो आहे.
शिवसेनेतील दोन मंत्र्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले एकनाथ शिंदे यांची वर्णी अत्यंत महत्त्वाच्या नगरविकास विभागात लावण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सुभाष देसाई आहेत. शिंदे आणि देसाई यांच्यात औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून वाद पेटला आहे. पालकमंत्र्यांच्या मर्जीतील महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरही काम करीत होते. देसाई यांना विश्वासात न घेता नगर विकास विभागाने स्मार्ट सिटीच्या सीईओपदी नगर परिषद मुख्य अधिकारी दर्जाचे अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची थेट नियुक्ती करून टाकली. यासाठी औरंगाबाद शहरातील सेनेचे एक आमदार नगरविकास विभागाकडे जोरदार पाठपुरावा करीत होते, अशी चर्चा आहे. मनोहरे यांच्या नियुक्तीनंतर लगेच पालकमंत्र्यांनी तोंडी स्थगितीही देऊन टाकली. त्यामुळे मनोहरे यांना तब्बल १८ दिवस रुजू होता आले नाही. शेवटी सोमवारी (दि.२१) ते स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजू झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. शिंदे गट सध्या वरचढ दिसून येत असला तरी अनुभवी देसाई गट यावर कशा पद्धतीने मात करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहराचे नुकसान होणार हे निश्चित
पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री यांच्या आपसातील वादामुळे शहराला परिणाम भोगावे लागणार हे निश्चित आहे. भविष्यात औरंगाबाद महापालिकेने आपला वाटा योजनेत टाकला नाही, तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडणार आहेत.