औरंगाबाद: गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जागोजागी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहे, शिवाय त्यांनी गस्त वाढविली असतानाही जाधवमंडी येथे बिनधास्तपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सिटीचौक पोलिसांनी बुधवारी रात्री धाड टाकून जुगार अड्डा चालविणाऱ्यासह ३० जणांना अटक केली. आरोपींकडून रोख १२ हजार ९०० रुपये आणि ७३ हजार रुपये किंमतीचे मोबाईल, जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, पोलीस उपनिरीक्षक पाथरकर ,पोहेकाँ अप्पासाहेब मनगटे आणि अन्य कर्मचारी हे बुधवारी रात्री शहागंजमधील सिटीचौक भागात नाकाबंदी करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, जाधवमंडी येथील बांबूगल्लीत जुगार सुरू आहे. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचाना सोबत घेऊन रात्री दिड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास अर्धे शटर वर असलेल्या गाळ्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी तेथे ३० जण पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसले. जुगार खेळणाऱ्यांसमोर रोख रक्कम आणि पत्ते पडलेले दिसले. पोलिसांना पाहून काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते.
मात्र पोलिसांनी त्यांना जागेवरून न हालण्याचे आदेश दिले. यानंतर प्रत्येक ाची झडती घेतली असता प्रत्येकांकडे रोख रक्क म आणि तर काही जणांकडे मोबाईल आणि रोख रक्कमही आढळली. हा जुगारअड्डा आरोपी रेवन मिनीनाथ सोनवणे (वय ३४,रा. जाधवमंडी) हा चालवित असल्याचे समजले. आरोपी रेवण हा प्रत्येक खेळामागे विशिष्ट रक्कम घ्यायचा अशी माहिती अन्य जुगाऱ्यांनी यावेळी पोलिसांना दिली. यावेळी सर्व जुगाऱ्यांकडून एकूण १२ हजार ९००रुपये आणि ७३ हजार रुपये किंमतीचे १९ मोबाईल हॅण्डसेट जप्त केले.
जुगारी बहुतेक व्यापारी जाधवमंडी येथे जुगार खेळणारे बहुतेक आरोपी हे परिसरातील लहानमोठे व्यापारी असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. शिवाय जुगारअड्डा चालविणाराही व्यापारीच असून तो जाधवमंडीतील रहिवासी आहे. आरोपी रेवणविरोधात जुगार अड्डा चालवित असल्या गुन्हा तर अन्य २९ लोकांविरोधात पैशावर जुगार खेळत असल्याची फिर्याद पोलीस हवालदार मनगटे यांनी नोदविली. सिटीचौक पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.