औरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, सप्टेंबरमध्येच नागरिकांना आॅक्टोबर हीट अनुभवावी लागत आहे. शहरातील तापमान गेल्या दहा दिवसांत २७ वरून ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
शहर आणि परिसरात तब्बल महिनाभरानंतर १६ आॅगस्ट रोजी जोरदार पाऊस बरसला होता; परंतु त्यानंतर पावसाने पुन्हा काढता पाय घेतला. पावसाची नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. आकाशात ढगांची गर्दीही होत नसल्याने भर पावसाळ्यात शहरात दररोज उन्हाचे चटके जाणवत आहेत.
पावसाळ्याच्या तीन महिन्यांत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये शहराचे तापमान साधारण ३० अंश असते. परंतु यंदा पावसाअभावी ११ सप्टेंबर रोजी ३२.६ अंश तर गुरुवारी ३१.२ अंश इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. दहा दिवसांत ३.३ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत तुरळक पाऊस राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. आता आणखी आठ दिवस मोठा पाऊस होणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आर्द्रता झाली कमीशहरात आणखी आठ दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. पावसाअभावी आर्द्रता कमी झालेली आहे. त्यामुळे कमाल तापमानातही वाढ झालेली आहे. - श्रीनिवास औंधक र, संचालक , खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद