औरंगाबाद : मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागताच कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील कोरोनास्थितीवर महापालिकेचे बारीक लक्ष आहे. आठवडा बाजारसह अन्य विषयांबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व महापालिका आयुक्तांनी आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. पांडेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरातील कोरोनास्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या सोबत समिती स्थापन केली आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी पुन्हा सुरु करण्याबद्दल देखील हेच धोरण आहे. शासनाने काही प्रोटोकॉल ठरवून दिले आहेत, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. महापालिकेने सध्या मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणीवर भर दिला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे घर सील करण्याची कारवाई सुद्धा करण्यात येईल. जास्त रुग्ण संख्या असलेल्या परिसरात पुन्हा पूर्वीप्रमाणे पत्रे लावून परिसर सील करण्यात येणार आहे.