औरंगाबाद : ब्रिटनहून आलेले आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज झाले आहे. ब्रिटनहून आलेला एक तरुण पॉझिटिव्ह आढळल्याने याठिकाणी दाखलही झाला आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील अन्य रुग्ण मनपाच्या मेलट्रॉन येथे हलविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे नवीन विषाणूने बाधित रुग्ण आढळले तरी येथे उपचार शक्य होतील.
मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर जी परिस्थिती होती, अगदी तशीच परिस्थिती ब्रिटनमधील नव्या विषाणूमुळे पहायला मिळत आहे. मार्चमध्ये आढळेला पहिला रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. याच खासगी रुग्णालयात आता ब्रिटनहून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेवर उपचार सुरू आहेत, तर मार्चमध्ये आढळेला दुसरा रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता आणि आताही ब्रिटनहून आलेला दुसरा पॉझिटिव्ह रुग्णही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात परदेशातून आलेल्या कोरोना सकारात्मक रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. त्यासाठी येथील एक मजला रिकामा करण्यात आला असून, भरती असलेले ११ रुग्ण मेलट्रॉनला हलविण्यात आले आहेत.
‘एनआयव्ही’च्या अहवालाची प्रतीक्षा
धूत हाॅस्पिटलमध्ये दाखल महिला रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. पुणे येथील एनआयव्हीचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा अहवाल सर्वप्रथम घाटी रुग्णालयास प्राप्त होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. हिमांशू गुप्ता यांनी दिली.