औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला महिनाभरापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळालेली औषधी संपली आहेत. त्यामुळे घाटीला पुन्हा एकदा औषधीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर घाटीला अत्यावश्यक औषधींचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून पुरवठा केला गेला; परंतु यामुळे घाटी रुग्णालयाची केवळ ३० टक्के गरज भागली. पुरवठा झालेली बहुतांश औषधी महिनाभरात संपली. घाटी रुग्णालयात गेल्या सात महिन्यांपासून औषधीटंचाई आहे. ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी होणार आहे. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधींची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
आजघडीला पॅरासिटामोलसारखे प्राथमिक औषध उपलब्ध नाही. याशिवाय अनेक आजारांवरील महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागते आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने म्हणाले, काही औषधी संपली आहे; परंतु औषधींची टंचाई नाही.
काही लवकर संपतातजिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेली औषधी संपली आहे. काही औषधी ही लवकर संपतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर औषधी खरेदी केली जात आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.