औरंगाबाद : सनदी लेखापाल यांनी दरवर्षी केलेल्या लेखा तपासणीनुसार माथाडी मंडळामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे ओढले नाहीत. नोंदीत माथाडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीसह सर्व रक्कम मंडळाकडे अत्यंत सुरक्षित असून, त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नाही, असा दावा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे उप आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी केला आहे.
नुकतेच खा. इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन माथाडी कामगार मंडळात ५० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मंडळाने कोणाचे नाव न घेता खुलासा केला. यात म्हटले आहे की, मंडळाने २०१९-२०२० या कालावधीत १९९५ नोंदीत माथाडी कामगारांना दिवाळी बोनसपोटी २ कोटी ४६ लाख ८८ हजार २१० रुपये इतकी रक्कम ८.३३ टक्के दराने कामगारांच्या थेट खात्यात जमा केली. अपघात विमापोटी २७ कामगारांना १२ लाख ५३ हजार ८४० रुपये देण्यात आले. या काळात ६४ कामगारांनी राजीनामे दिले. त्यांना भविष्य निर्वाह निधी ९४ लाख १० हजार ६४५ इतकी रक्कम दिली. त्यावरील व्याजपोटी ४३ लाख ६५ हजार ८८७ एवढे रुपये अदा करण्यात आले. व्यापारी त्यांच्याकडील कामगारांचा कामाचा मोबदला मंडळाकडे जमा करत असतात. मजुरीच्या रकमेत कोणतीही बेकायदेशीर कपात केली जात नाही. धनादेश व आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. लेव्ही सुद्धा कामगारांच्या मजुरीतून कपात केली जात नसल्याचे पोळ यांनी नमूद केले.
चौकट
लेखा अहवाल शासनाकडे सादर
मंडळातर्फे सांगण्यात आले की, मंडळाच्या लेखा तपासणीचे काम राज्य शासनाने नियुक्त केलेले सनदी लेखापाल करतात. त्याचा अहवाल शासनाला सादर केला जातो. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षापर्यंत लेखापरीक्षण झाले असून उर्वरित प्रलंबित काम करण्यासाठी सरकारने नवीन पॅनल अधिसूचित केले आहे.