लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील श्रीं गणपती विसर्जन दरम्यान पोलीस प्रशासनाशी वाद घालणाºया तीन गणेश मंडळा सोबतच २५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटे गुन्हे दाखल झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.सुरळीत चालू असलेली विसर्जन मिरवणूक जिरे गल्ली येथे आली असता स्वामी विवेकानंद गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यातच आपली वाहने सोडून मिरवणुकीत अडथडा निर्माण केला. तसेच गैरकायद्याची मंडळी जमा करून बंदोबस्तावर असलेल्या पोनि डॉ. गणपत दराडे, सपोनि साईनाथ अनमोड यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोनि डॉ. दराडे यांच्या फिर्यादीवरून गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व इतर २५ जणांवर विविध गुन्हा दाखल केला आहे. तर सार्वजनिक रस्त्यावरून विनापरवाना मिरवणूक काढल्याने ६ व्यक्तीवर जमादार फक्रोद्दीन सिद्दीकी यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा विविध प्रकरणात एकूण ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ७ गणेश मंडळांपैकी ३ गणेश मंडळाने ध्वनिप्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दराडे यांनी दिली आहे. या सर्व प्रकारामुळे पोलीस प्रशासनाने गणेश मंडळासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत असून याबाबत आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्यावतीने दिला आहे.
औंढा येथे विसर्जनादरम्यान वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:39 AM