छत्रपती संभाजीनगर : हुंड्याचे राहिलेले दोन लाख घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेसह तिच्या माहेरच्यांना बेदम मारहाण केली. तर मुलीला नांदायला सोडायला यायला एवढे लोक आणायची गरज नव्हती, असे म्हटल्याने सुनेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्यांना बेदम मारहाण केली. ही घटना २८ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मयूरपार्क येथे घडली.
हर्सुल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामराव पंढरीनाथ श्रीरामे (रा. मयूरपार्क) याच्या सुनेला सोडण्यासाठी तिचे माहेरचे विष्णू बालाजी खांडेकर, बालाजी बिरबल खांडेकर, बंडू ज्ञानोबा पांढरे, माधव बिरबल खांडेकर, शिवाजी बिरबल खांडेकर, राजू बिरबल खांडेकर आणि एक महिला (सर्व रा. देगाव रोड, देगलूर, जि. नांदेड) हे श्रीरामे यांच्या घरी आले होते. मुलीला एवढे लोक सोडायला येण्याची गरज नव्हती, असे म्हटल्याने खांडेकर कुटुंबीयांनी श्रीरामे आणि त्यांच्या पत्नी, मुलांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केलं. विटकरीने तोंडावर मारून जखमी केले.
तर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिजित श्रीरामे, रामराव श्रीरामे, अनिकेत श्रीरामे (सर्व रा. मयूरपार्क) यांच्यासह एका महिलेने हुंड्याचे राहिलेले दोन लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत १ एप्रिल ते २८ मे दरम्यान वाद घालून शारीरिक आणि मानसिक छळ केला. २८ मे रोजी तिचे वडील दीड लाख रुपये घेऊन श्रीरामे यांच्या घरी आले. तेव्हा ५० हजार कमी का आणले म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. अनिकेत याने चाकूने विवाहितेच्या वडिलांना, चुलते आणि मामा यांना मारहाण करून जखमी केले. तर तिच्या सासूने ॲसिड अंगावर फेकण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंदविण्यात आले.