सिल्लोड ( औरंगाबाद): येथे सोमवारी खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व त्यानंतर दुपारी ४ वाजता येथील नगर परिषद प्रशालेच्या मैदानावर प्रचंड जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री तथा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सिल्लोड येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सामन्यानंतर आता ज्युनिअर ठाकरे आणि शिंदे यांच्या सामना रंगणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सिल्लोड येथे भव्य सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्याच पद्धतीने खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून सभेसाठी प्रचंड संख्येने उपस्थिती असेल, असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे हे देखील आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी सिल्लोड येथे ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकजवळील मैदानात पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील.
सिल्लोडमध्ये राजकीय वातावरण तापले कृषिमंत्री अब्दुल सत्तार मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्यावर थेट टीका करत आहेत. त्यांनी आदित्य यांचा छोटा पप्पू असा देखील उल्लेख केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांचे आव्हान स्वीकारत औरंगाबाद दौऱ्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर मंत्री सत्तार यांनी खा. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाचे त्याच दिवशी आयोजन केले. तसेच आदित्य यांच्या सभेस आधी परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी परवानगी देण्यात आली. यामुळे आज आदित्य ठाकरे हे मंत्री सत्तार यांच्याबद्दल काय बोलतील आणि खा. श्रीकांत शिंदे हे समोर आलेल्या आदित्य ठाकरेंवर सभेतून कसा वार करतात याची उत्सुकता आहे.