खुलताबाद ( औरंगाबाद ) : कोरोनामुक्त कागजीपुरा येथील जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी ते ८ वीचे वर्ग आज गुरूवारपासुन सुरू करण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतस्तरावर संरप़च व शालेय समितीने कोरोना नियमांचे पालनकरून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. शाळेमध्ये मित्रांच्यासंगतीने विद्यार्थ्यांनी उत्साहात आगमन केल्याचे चित्र होते.
कोरोनामुक्त असलेल्या गावांत, सरपंचाच्या अध्यक्षतेखालील समितीचा ठराव घेऊन पालकांच्या लेखी संमतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनामुक्त ४४६ गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गुरुवारी पहिल्यांदा शाळांची घंटा वाजली. ग्रामीण भागात ५९५ गावांत ८५२ शाळा आहेत. १६ जूननंतर एकही कोरोनाचा रुग्ण न आढळलेली ४४६ गावे आहेत. शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते.
कागजीपुरा येथे सरपंचाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गाव शंभर टक्के कोरोनामुक्त गाव असल्यामुळे ४थी ते ८ वी पर्यंत वर्गसुरु करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या बैठकीस सरपंच नाजरीन साजीद कुरैशी, उपसरपंच शेख अहेमद, तलाठी आर. डी. कराळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहमंद अलताफ हुसेन,वैद्यकीय अधिकारी डाॅ. बी. आर. पांडवे, ग्रामसेवक व्ही. एम. आदमवाड,केंद्रप्रमुख के ई गायकवाड , मुख्याध्यापक आस्मा बीबी मोहमंद हाफीज उपस्थित होते. यानंतर आजपासून येथील शाळा सुरु करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. आज ४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नियमानुसार अर्धे विद्यार्थी एकदिवसाआड बोलविण्यात येत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
गाव कोरोनामुक्त करणे आणि ठेवण्याचे असेल आव्हानजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णवाढ कमी असली तरी अद्यापही दोन अंकी वाढ सुरूच आहे,तर दोनशेहून अधिक गावे सध्याही बाधित आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, तर शाळा सुरू झाल्यावर गावात रुग्ण आढळला, तर शाळा बंद करण्यात येईल. त्यामुळे गावकऱ्यांवरही गाव कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आता असणार आहे.