औरंगाबाद : राज्याच्या शिक्षण विभागाने ५वी ते ८वीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, औरंगाबाद महापालिका हद्दीतील ६वी ते ८वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. हे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी सायंकाळी काढले.
शहरात मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी २३ मार्चपासून मनपा हद्दीतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत दिवाळीनंतर राज्यातील शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्प्याने उघडण्याचे आदेश काढले. तब्बल १० महिन्यानंतर शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सुरुवातीला ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यानंतर आता शिक्षण व क्रीडा विभागाने ५वी ते ८वीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे परिपत्रक काढले.
हे आदेश मनपा क्षेत्रासाठी लागू नसल्यामुळे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वतंत्रपणे आदेश काढले आहेत. मनपा हद्दीतील ६वी ते ८वीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. हे वर्ग सुरू करताना पालकांकडून आवश्यक ती संमती घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पर्याय निवडलेला असेल त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावे, असे आदेशात नमूद आहे.