छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक छत्रपती संभाजीनगरात येतात. अजिंठा लेणी, त्यातील पेंटिंग संवर्धनाचे आव्हान आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ही जबाबदारी पार पाडत आहे. अगदी लेणीचा कालावधी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन साधून लेणीचे संवर्धन केले जाते. लेणी भेंगांवर नदीची माती, साळीचा भुसा अन् डिंक आदी साहित्य वापरून प्लास्टर केले जाते.
१८१९ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा अजिंठ्यात शिकारीनिमित्त आला होता. तो लेणापूर शिवारात शिकार करीत असताना वाघाच्या शोधात त्याला वाघूर नदीच्या पत्राशेजारी अजिंठा लेणीचा शोध लागला अन् हा जागतिक कलेचा अद्भुत वारसा जगासमोर आला, तो दिवस होता २८ एप्रिल १८१९. लेणीच्या शोधाला दोनशेपेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. लेणी आणि त्यातील पेंटिंग संवर्धनाचे आव्हान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणासमोर आहे. त्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून लेणीचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अजिंठा लेणी ज्या काळात साकारल्या गेली, अगदी त्याच काळाप्रमाणे साहित्यांचा वापर करून अगदी त्याच पद्धतीने लेणीचे जतन, संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे ‘वैज्ञानिक संवर्धन आणि पेंटिंगचे जतन’ याविषयावर नुकतीच दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी अजिंठा लेणीतील पेंटिंग संवर्धनावर छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्त्व रसायनशास्त्रज्ञ पुरातत्त्व रसायनशास्त्रज्ञ उपअधीक्षक डाॅ. एस. विनोद कुमार यांनी मार्गदर्शन केले.
संवर्धनासाठी या साहित्यांचा वापरवाघूर नदीतील माती, तिळाचे तेल, डिंक, शेणखत, तांदळाच्या साळीचा भुसा अशा नैसर्गिक साधनांचा वापर करून लेणीतील भेगा भरण्याचे काम केले जाते. कपडा घेतला आणि पेंटिंग पुसून काढले, अशाप्रकारे संवर्धनाचे काम होत नाही. संवर्धनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी चाचणी केली जाते. लेणीतील पेटिंगवर धूळ आहे की अन्य काही यांचा अभ्यास केला जातो. पेंटिंग ज्या परिस्थितीत आहे, तशाच अवस्थेत जतन करण्यावर भर दिला जातो. लेणीतील मूर्तींचेही अशाच पद्धतीने जतन केले जाते.