औरंगाबाद : महापालिका प्रशासनाकडून यंदा शहरातील नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. मनपा प्रशासन आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी सायंकाळी या कामांची पाहणी केली. १५ जूनपर्यंत शहरातील सर्व लहान-मोठे नाले स्वच्छ झालेच पाहिजेत, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील विविध नाल्यांची पाहणी महापालिका प्रशासक यांनी केली. त्यांनी रेणुका माता मंदिर, ज्ञानेश्वर नगर, एम २, एन ९ हडको, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बंगला, कटकट गेट, दमडी महल, महापालिका मुख्य इमारतीमागील नाला, अंजली टॉकीजसमोरील नाला, औरंगपुरा, देवानगरी, प्रतापनगर, डी मार्ट, आदी नाल्यांच्या स्वच्छतेची व नाल्यावर जाळी बसविणे, चेंबर बनविणे, ढापे टाकणे, पिचिंग करणे, आदी कामांची सूचना त्यांनी दिली. रेणुकामाता येथील नाल्यात नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून जाळ्या बसवून येथील कचरा तांत्रिक पद्धतीने काढण्यात यावा, एम २, एन-९ हडको येथील एका दुकानासमोर उघड्या असलेल्या नाल्यावर दुकानदाराने स्लॅब टाकून त्याची देखभाल करावी, अशा आशयाची नोटीस बजावण्याचे आदेश दिले, तर प्रतापनगर येथे पिचिंग करण्याचे आदेश देऊन नाल्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कटकट गेट येथील नाल्याच्या कामाची पाहणी करीत असताना तेथील कचरा बघून त्यांनी येथील कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच तेथील नाल्यावर स्लॅब टाकून तात्पुरते फ्रुटशाॅप महापालिकेने तयार करावेत जेणेकरून त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख, सहायक उपायुक्त नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, के. एम. फालके, आर. पी. वाघमारे, आदींची उपस्थिती होती.
लहान मुलाचा आदर्श घ्यावा
कटकट गेट भागात पाहणी करीत असताना जमीर या लहान बालकाच्या तोंडाला मास्क लावलेले बघून प्रशासक पाण्डेय यांनी त्याला जवळ घेतले त्याचे नाव विचारले. त्याचे कौतुक केले. परिसरात काही नागरिकांनी मास्क लावलेले नसल्याचे दिसून आले. या चिमुकल्याचा तरी आदर्श नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.